संभाजी भिडे गुरुजी प्रणित श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची प्रतापगड ते रायरेश्वर जावळी अरण्यमार्गे सुरु झालेल्या गडकोट मोहिमेचा झेंडा सोमवारी सायंकाळी रायरेश्वरावर अखेरच्या मुक्कामासाठी पोहोचला. सुमारे लाखभर धारकरी या मोहिमेत रायरेश्वरावर पोहोचले आहेत. मंगळवारी जांभळी (ता वाई) येथे गडकोट मोहिमेचा समारोप होणार आहे. गडकोट मोहिमेसोबत प्रथमच सातारा पोलीसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.

प्रतापगडावरुन जावळी अरण्यामार्गे रायरेश्वर मोहिमेत पहिल्या दिवशीच सुमारे पन्नास हजार धारकरी(कार्यकर्ते) यात सामील झाले होते. मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पार आणि शनिवारी क्षेत्र महाबळेश्वरच्या मुक्कामानंतर रविवारच्या बलकवडी(ता वाई) धरण मुक्कामाकडे सकाळी सहा वाजता ध्वज रवाना झाला. क्षेत्र महाबळेश्वरातून जोर खोऱ्यात मोहीम उतरली. बलकवडी धरणालगत मुक्काम झाला. बलकवडी येथून सोमवारी उळूंबपुलावरुन मोहीम पुढे मार्गस्थ झाली. नांदगणे,कोढवली,आकोशी,कमळगड मार्गे,तुपेवाडी व मोहिमेचा दुपारचा विसावा व भंडारा वासोळे येथे झाला. या मोहिमेचा अखेरच्या मुक्कामाचा ध्वज सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान रायरेश्वरावर पोहोचला. सर्व धारकरी रायरेश्वरावर पोहोचायला आठ वाजतील. रायरेश्वराच्या पायथ्याशी जांभळी येथे (ता.वाई) मोहीमेचा समारोप होणार आहे.

समारोपासाठी राज्यभरातून आणखी धारकरी वाई मार्गे रायरेश्वर आणि जांभळीकडे रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले आदी मान्यवर समारोपाला हजर राहणार आहेत. संभाजीराव भिडे गुरुजींचे मोहिमेच्या समारोपाचे भाषण फार महत्वाचे आणि धारकऱ्यांना दिशा देणारे असते. त्यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.