महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात केली. राज ठाकरेही महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. ‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की, द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.

भास्कर जाधव काय म्हणाले?

“मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, तुम्ही मुळचे शिवसैनिक आहात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे तुम्ही शिवसैनिक आहात. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला, तो निर्णय त्यांना घेऊद्या. परंतु मी मनसैनिकांना जाहीरपणे आवाहन करतो की, आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे रहा आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा”, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा : Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन

भास्कर जाधव यांच्या या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपरकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भास्कर जाधव आम्हाला तुमची दया येते. राज ठाकरे यांची टाळी कधी पाहिली आहे का? आम्हाला आता उद्धव ठाकरे यांची कीव येते आणि कोत्या मनोवृत्तीची चीड येत आहे’, असे अमेय खोपरकर म्हणाले आहेत.

भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला?

भास्कर जाधव यांनी भाजपावरही टीका केली. ते म्हणाले, “विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही आलो आहोच. गद्दारांच्या विरोधात लढण्यासाठी हा जनसागर आहे. महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विनायक राऊत यांची लोकप्रियता जनसमान्यांत आहे. भाजपाने वीस आणि नंतर तीन जागा जाहीर केल्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागा जाहीर करण्याची वेळ आल्यावर सर्व्हेचे नाटक पुढे केले गेले. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या जागा जाहीर करताना भाजपाचा सर्व्हे बाहेर कसा आला?”, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.