शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात बाचाबाची झाली. अरे-तुरेवर हा वाद गेल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्ती केल्याने वादावर पडदा पडला.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलत होते. तेव्हा राणा जगतजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना ‘बाळ आहेस तू’ असं म्हटलं. यावर ओमराजे निंबाळकर संतापले. ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहिती आहे. जास्त बोलू नको, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही,’ असं म्हणत खडसावलं. यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

पीक विम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीत विरोधी पक्षातील खासदार, आमदारांना बोलण्यात आले नव्हते. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा प्रश्नी बैठक घेत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकच गोंधळ सुरु झाला. यानंतर बैठकीला का बोलवलं नाही? हा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हमरातुमरी झाली.