शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट व शिंदे गटात चुरस निर्माण झालीय. अनेक आमदारांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलंय. दुसरीकडे पक्ष संघटनेच्या पातळीवर बहुसंख्य पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसत आहे. मात्र, आता कोल्हापूरमध्ये पक्ष संघटनेबाबत उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी मंडलिक समर्थक गटाने केली. हमिदवाडा कारखान्यावर रविवारी (१७ जुलै) मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही आग्रही भूमिका मांडण्यात आली. तसेच निर्णयाबाबतचे सर्वाधिकार खासदार मंडलिक यांना देण्यात आले.

रोहित संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या मंडलिक गटाने कोल्हापुरात हात उंचावून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.

मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यातील भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

“लोकसभा निवडणुकीनंतर करोना महामारी आणि महापुराच्या कारणाने खासदारांचा निधी गोठवल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाताना जनतेपुढे निधीतून उभारलेली विकास कामे दाखवावी लागणार आहेत. राज्यात शिंदे यांचे सरकार तर केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांच्या विकास निधीसाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी रहावे,” अशी भावना प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना आणि ठाकरे घराणे याविषयीची कृतज्ञतेची भावनाही व्यक्त करायला कार्यकर्ते विसरले नाहीत.

यावेळी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादारआर. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , एन. एस. चौगुले, आनंदराव फराकटे, अनिल सिद्धेश्वर, भगवान पाटील, जयवंत पाटील, सुधीर पाटोळे, सत्यजित पाटील, विश्वास कुराडे आदी कार्यकर्त्यांनी मनोगतातून शिंदे गटाबरोबर जाण्याचा विचार व्यक्त केला. दत्ता कसलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मंडलिकांनी राहावे अशी भूमिका मांडली.

हेही वाचा : मोठी बातमी! शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ‘या’ दिवशी होणार सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास निधीसाठी आणि भविष्यातील राजकारणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह खासदार संजय मंडलिक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निरोप आपण खासदार मंडलिक यांना देत असल्याचे सांगून वीरेंद्र मंडलिक यांनी आगामी निवडणुका मंडलिक गट ताकदीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.