कर्नाटकचे मुख्यमंत्री रोजच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. त्या अपमानावर केंद्राकडे आवाज उठविण्याची हिंमत न दाखवल्यामुळेच पंतप्रधानांनी नागपूरच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारलेली दिसते असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे. मुंबईतील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून त्यांच्या ‘निर्भया’ योजनेतील पोलीस वाहने खोकेबाज बेइमान आमदारांच्या सुरक्षेसाठी लावल्याबद्दल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना जवळ खेचून शाब्बासकी दिली नसेल ना? अशी शंकाही शिवसेनेने उपस्थित केली आहे. महिलांना सुरक्षा नाही व गद्दार आमदारांच्या मागे-पुढे पोलिसी लवाजमा. यालाच म्हणतात- ‘‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या!’’ आपल्या देशाची अर्थव्यवस्था याच पायावर उभी आहे अशी टीकाही करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे संपादकीयमध्ये –

“पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी नागपूर-शिर्डी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. सोहळा उत्तमच झाला. पंतप्रधान मोदी यांनी देशाची लूट करणाऱ्यांवर व भ्रष्ट मार्गाने राज्य करणाऱ्यांवर एका तळमळीने आसूड ओढले, पण हे शब्दांचे आसूड ओढताना त्यांनी आपल्या डाव्या-उजव्या बाजूला कटाक्ष फेकला असता तर देशाची लूट करणारे, भ्रष्ट मार्गाने राज्य करणारे कोण हे लक्षात आले असते. पंतप्रधानांच्या व्यासपीठावरच एक घटनाबाह्य सरकार बसले होते व ‘खोके’ सरकार म्हणून ते बदनाम आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कितीही तळमळीने भावना व्यक्त केल्या तरी ते एकटे कोठे पुरे पडणार?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“अनेकदा मनात नसतानाही घटनाबाह्य सरकारच्या पाठीवर थाप मारावी लागते. महाराष्ट्रात विकासातील ११ तारे उदयाला येत आहेत. यातील पहिला तारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी महाराष्ट्र विकासाच्या 11 ताऱ्यांची ‘गिनती’ केली, पण गेल्या दोन-चार महिन्यांत महाराष्ट्रातून अनेक औद्योगिक प्रकल्प ओरबाडून गुजरातेत नेल्याने विकासाची गंगा थांबली व लाखो तरुणांचा रोजगार गेला. महाराष्ट्राच्या तिजोरीचे नुकसान झाले. महाराष्ट्र हा कृषी व औद्योगिक क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचा तारा होता. तो तारा गेल्या काही महिन्यांत निस्तेज करण्याचे प्रयत्न कोणी केले याचे उत्तर पंतप्रधानांनी नागपुरातच द्यायला हवे होते,” अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

“नागपूरच्या मिहानमधूनच प्रकल्प गुजरातेत गेले हे काय उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माहीत नाही? महाराष्ट्राचे नाक कापून पुन्हा 11 ताऱ्यांची भाषा करणे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून उजळ माथ्याने वावरणाऱ्या व्यक्ती पंतप्रधानांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसल्या होत्या. शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे प्रखर तेजस्वी सूर्य आहेत. त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला, पण पंतप्रधान तारे-ग्रह वगैरेंवर भाषण करत राहिले. पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘उत्पन्न आठ आणे, खर्चा रुपय्या हे धोरण अवलंबणारे देशाला आतून पोकळ करतील,’ असे पंतप्रधानांनी सांगितले ते खरेच आहे. पण हे सावकारी व्यवहार कोण करीत आहेत, असा प्रश्न महाराष्ट्रातील अर्थतज्ञांनी विचारला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“देश आर्थिक संकटात असताना, कोरोना काळात लोक रोजगार व जगण्यासाठी संघर्ष करीत असताना पंतप्रधानांसाठी साडेआठ हजार कोटींचे खास विमान खरेदी केले. संपूर्ण दिल्ली आडवी करून संसद भवनासह नवे प्रकल्प ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या नावाखाली उभारले जात आहेत. त्याचा खर्च अंदाजे 20-25 हजार कोटी आहे. या सगळ्याची गरज आहे काय?,” असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

“ठाणे पालिकेत रुपय्या-अठन्नी वगैरेंचे घोळ आहेत काय”

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांच्या बाजूलाच बसले होते. त्यांनीच आतापर्यंत चालवलेल्या ‘ठाणे’ वगैरे महानगरपालिकेचे ऑडिट केले तर ‘खर्च रुपयाचा व उत्पन्न आठ आण्याचे’ याचा खरा अर्थ सहज समजेल. ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत म्हणे कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतपतही पैसे नाहीत. हे असे का झाले? इथे रुपय्या-अठन्नी वगैरेंचे घोळ आहेत काय त्याचाही शोध घ्यावा लागेल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“आमचा संबंध फक्त ‘समृद्धी’च्या ठेकेदारांच्या व्यवहाराशी नव्हता, तर प्रत्यक्ष विकासाशी होता. विकासाचे स्वप्न हे राज्याचे व देशाचे असते. एखाद्या व्यक्तीचे नसते. मात्र तसा विचार जे करतात त्यांना अकलेचे तारे म्हटले जाते. असे अकलेचे तारे सध्या सर्वत्र काजव्याप्रमाणे लुकलुकत आहेत. समृद्धी महामार्गास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे म्हणे आपले मुख्यमंत्री महोदयांचे डोळे पाणावले! हे ढोंगच आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम जेथे पार पडला त्या कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चार मोठे कटआऊट सरकारतर्फे लावण्यात आले होते. त्यात हिंदुहृदयसम्राटांचे कटआऊट सगळ्यात शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर होते. ज्यांच्या नावाने हा महामार्ग त्यांचे स्थान सगळ्यात शेवटी व आपले मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावाने डोळे पुसत होते! सगळ्यात आधी मोदी, त्यामागे श्री. फडणवीस मग मुख्यमंत्री व शेवटी बाळासाहेब ठाकरे हा क्रम कोणी लावला?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याच सडक्या डोक्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्राचा मुख्य तारा अशाप्रकारे अपमानित करून इतर अकरा ताऱ्यांचे गुणगान कसे करता, मग ते हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय असोत, नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रात येऊन आमच्या दैवतांचा अपमान करण्याचा जणू अफझलखानी विडाच या मंडळींनी उचलला आहे. लोकार्पण सोहळ्याच्या वेळी म्हणे पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्याजवळ खेचले व पाठीवर थाप मारली व त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्यासमोर ओशाळवाण्या चेहऱ्याने हात जोडून उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे जी काही शाब्बासकी दिली ती कशासाठी? तर ‘‘शाब्बास! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते शिवसेना फोडण्याचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केलेत. शाब्बास रे माझ्या गब्रू!’’ शाब्बासकी असेल ती यासाठीच,” असा संताप शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“पुन्हा राज्यात सतत सुरू असलेल्या शिवरायांच्या अपमानाचे काय, शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना कधी हटवताय, असे स्वाभिमानी प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याची हिंमत मिंधे मुख्यमंत्र्यांमध्ये नसल्यामुळेच पंतप्रधानांनी त्यांना शाब्बासकी दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोजच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. त्या अपमानावर केंद्राकडे आवाज उठविण्याची हिंमत न दाखवल्यामुळेच पंतप्रधानांनी नागपूरच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारलेली दिसते,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena saamana editorial on pm narendra modi maharashtra cm eknath shinde samruddhi highway sgy
First published on: 13-12-2022 at 07:28 IST