लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मनमोहन सिंग यांच्याइतका इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या काळात कोणावरही सूडाची कारवाई झाली नाही. ज्यांच्यावर कारवाई होणार होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी त्यात पुढाकार घेतला असंही संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदींनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला होता”, शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“स्वत: शरद पवारांनी ज्यांचे घोडे आज उधळले आहेत त्यांना वाचवलं आहे. राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा आणि राज्यघटनेचा गैरवापर करु नये. राजकारणात मधांद हत्तीप्रमाणे उधळू नये, हत्तीही कोसळतात,” असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते बुधवारी झाले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शऱद पवारांनी मनमोहन सिंग यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत बोलत होते.

शरद पवारांनी काय म्हटलं –

काँग्रेसच्या काळात सूडाचे राजकारण होत नसल्याचे नमूद करून पवार म्हणाले, की “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर सर्वाधिक हल्ले चढवले. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीमध्ये अंतर वाढले होते. मोदी यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी माझ्याशिवाय कोणीही इच्छुक नव्हते. राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या विकासाच्या आड येता कामा नये, ही मी मांडलेली भूमिका तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केली. काँग्रेसमधील काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली होती. मात्र चौकटीच्या बाहेर जाऊ नये आणि सूडाचे राजकारण करता कामा नये या भूमिकेवर मी आणि डॉ. मनमोहनसिंग ठाम होतो”.

“…म्हणून अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले”; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“मात्र आता जे काही सुरू आहे ते ठीक नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांपैकी एकच आरोप विचार करण्याजोगा आहे. देशमुख यांनी एका कंपनीकडून चार कोटी रुपये घेतले. ही रक्कम त्यांच्या शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली, सत्तेचा गैरवापर करून ही रक्कम घेण्यात आली, अशी माहिती तपास यंत्रणेची आहे. मात्र देशमुख यांच्यावर सातशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या वरून व्यक्ती आणि पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती टोकाचा आहे हे दिसते,” असंही शरद पवार म्हणाले.

“मोदी मास्क लावत नाही, म्हणून मी पण लावत नाही”

“निर्बंध आले की पुन्हा एकदा महाराष्ट्राचं अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, काम, रोजगार यावर फार मोठं संकट येईल. ते येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान जरी मास्क लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचं ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात पण मोदी देशाचे नेते असून कुठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत आणि मीदेखील त्यांचं आचरण करतो. त्यामुळे मोदींनीसुद्धा मास्क लावावा, नियमांचं पालन करावं,” अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on former pm manmohan singh sgy
First published on: 30-12-2021 at 12:32 IST