परभणी – गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे जिल्हाप्रमुखपद रिक्तच होते. दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या रिक्त जागा पक्षाने भरून काढल्या असून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गंगाप्रसाद आणेराव आणि डॉ. विवेक नावंदर यांच्या नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्या आहेत. आणेराव यांच्याकडे परभणी, गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून डॉ. नावंदर यांच्याकडे परभणी महानगरक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.
सेनेच्या संघटनात्मक पद्धतीत कार्यकर्ते व पक्ष यांच्यात दुवा असणारे संपर्कप्रमुखपद मात्र अजूनही रिकामेच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्हाप्रमुख पदांच्या नियुक्तया पक्षाने जाहीर केल्या.
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे परभणीत वर्चस्व असल्याने हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे दोघेही लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या पडझडीच्या काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिले. फाटाफुटीच्या काळात सेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिला पण विधानसभा निवडणुकीपासून या पक्षाला जिल्हाप्रमुखपदच नाही.
विशाल कदम आणि संजय साडेगावकर हे दोघे या पक्षाचे जिल्हाप्रमुख होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान साडेगावकर यांनी वंचित बहुजन आघाडीची कास धरली. तर निकालानंतर विशाल कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. सेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख पक्ष सोडून गेल्याने ही पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होती.
शिवसेनेच्या संघटनात्मक पद्धतीत संपर्कप्रमुखपद हेही महत्त्वाचे मानले जाते. सुभाष भोयर हे संपर्कप्रमुख होते. जिल्ह्याची पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व यांच्यात दुवा म्हणून या पदाकडे पाहिले जाते. हे संपर्कप्रमुख शक्यतो मुंबईतलेच नेमले जातात. परभणी जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कप्रमुखच नाही.
पूर्वी सहसंपर्कप्रमुख हे एकच पद होते पण आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एका सहसंपर्कप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विवेक नावंदर (परभणी), प्रा. पंढरीनाथ धोंडगे (पाथरी), सुधाकर खराटे (गंगाखेड), गंगाप्रसाद घुगे (जिंतूर) असे पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय चार सह संपर्कप्रमुख आहेत. पक्षाचे दोन जिल्हाप्रमुखपद मात्र रिक्त असल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती.
आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा आहे. परभणी महानगरपालिकेसह जिल्ह्यातील अन्य पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना ‘उबाठा’ पक्षाचे दोन्ही जिल्हाप्रमुखपद रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. अखेर उशिराने का होईना या दोन नियुक्तया करून पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेतली आहे.
आणेराव यांनी यापूर्वीही जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली असून डॉ. नावंदर यांनी सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी यापूर्वी सांभाळली आहे. या दोन्ही नियुक्तया जाहीर करताना पक्षाने खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील या दोन्ही स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय राहील असा प्रयत्न केला आहे. आणेराव हे खासदार जाधव यांचे समर्थक मानले जातात तर नावंदर हे आमदार पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. सहसंपर्कप्रमुख पदावरून महानगरप्रमुख अशी जबाबदारी देऊन पक्षाने एका अर्थाने नावंदर यांची पदावनती केल्याचे मानले जात आहे.