अहिल्यानगर : श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अश्वारूढ पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेधार्थ तसेच पुतळा शिवाजी महाराज चौकातच व्हावा या मागणीसाठी हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत बोलताना हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी, मुस्लिम मतांसाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जागा बदलल्याचा आरोप केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी सुदाम महाराज चौधरी होते. यावेळी आचार्य महेश व्यास, हिंदू जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरेगावकर, हभप सेवालाल महाराज, ऋषिकेश महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय पांडे, सुनील खपके, अशोक साळुंखे, सुरेश असणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश चित्ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाची अडचण असल्याचे सांगितले जाते. मात्र इतर ठिकाणी राष्ट्रीय महामार्गवर परवानगी घेऊन पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच पद्धतीने मार्ग श्रीरामपूरमध्ये मार्ग काढून छत्रपतींचा पुतळा बसवला जाऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अश्वारूढ पुतळ्याचे शिवाजी महाराज चौकात भूमिपूजन करण्यात आले, मात्र वर्षभरानंतर जागा बदलण्यात आली. न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलनाच्या मार्गावर लढावे लागेल.
आचार्य महेश व्यास म्हणाले, जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासाठी शिवाजी महाराज चौकात भूमिपूजन करण्यात आले आणि नंतर अचानक जागा बदलून हिंदू समाजाचा अपमान करण्यात आला. तो सहन करणार नाही. प्रतीक्षा कोरेगावकर म्हणाल्या, दैदिप्यमान राजांच्या स्मारकाची श्रीरामपूरमध्ये हेळसांड होत आहे. स्मारकासाठी ४० वर्षे लढा उभारावा लागतो, हे महाराष्ट्राचे व हिंदूंचे दुर्दैव आहे.