सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी ही माहिती दिली. या आंदोलनाबरोबरच मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न असल्याचे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा

वीज ग्राहक संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, मनोज घाटकर, तुकाराम म्हापसेकर आणि समीर शिंदे उपस्थित होते.

अनेक मागण्यांसाठी आंदोलन

सचिव दीपक पटेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यांच्यात संयुक्त बैठक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र, दहा दिवस उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

अतिरिक्त डिपॉझिटचा मुद्दा: ग्राहकांकडून प्रथम मीटर घेताना डिपॉझिट घेण्यात आले असतानाही, आता नव्याने डिपॉझिटची मागणी केली जात आहे. जुने डिपॉझिट शून्य करून नवीन डिपॉझिटची रक्कम वसूल करण्याचा हा प्रकार ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड लादत आहे.

स्मार्ट मीटरचा विरोध: गावोगावी अदानी कंपनीचे लोक स्मार्ट मीटर बसवत असून, त्यामुळे ग्राहकांना भरमसाठ बिले येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, ज्यांचा ग्राहक संघटना विरोध करत आहे.

श्री.वेंगुर्लेकर म्हणाले ,दोडामार्ग तालुक्यात महालक्ष्मी कंपनीची स्वस्त वीज गोव्याला दिली जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला मात्र महागडी वीज दिली जात आहे. या अन्यायाविरोधातही ग्राहक आवाज उठवणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्विय सहाय्यकांशी बोलणे झाले असून, सोमवारी (उद्या) त्यांना निवेदन दिले जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांचीही भेट झाली असून, ते बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात वीज परिषद

येत्या ११ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे वीज ग्राहकांची परिषद होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २०० ग्राहक त्यात सहभागी होणार आहेत. तसेच, जिल्ह्यातील ३५० पीडित ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३.५९ लाखांहून अधिक ग्राहक

संजय लाड यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ लाख ५९ हजार २२६ वीज ग्राहक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विजेची समस्या गंभीर बनत आहे. गणेशोत्सवामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट मीटरमुळे आलेल्या मोठ्या बिलांच्या विरोधात ग्राहक संघटनेकडे येत असून, १५ ऑगस्टच्या आंदोलनात हे सर्व प्रश्न एकत्रितपणे मांडले जातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन लाड यांनी केले.