सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीसह इतर सर्व हत्तींना पकडून लवकरच ‘वनतारा’ येथे पाठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी वनमंत्र्यांशी चर्चा केली असून, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच मानवी जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर, या हत्तींना सुरक्षितपणे पकडून ‘वनतारा’मध्ये पाठवण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात आला आहे. याबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, वनमंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, पुढील आठवड्यात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.
’वनतारा’मध्ये प्राण्यांची योग्य काळजी घेतली जाते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने, हत्तींना तिथे पाठवणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे, हत्तींची योग्य काळजी घेतली जाईल याची खात्री आहे, असेही ते म्हणाले.
याशिवाय, शक्तीपीठ महामार्गाबाबत ते म्हणाले की, पुण्यातील बैठकीत ते सहभागी होणार आहेत. या बैठकीत, शेतकऱ्यांचे नुकसान टाळून हा महामार्ग रेडी बंदर आणि रेडी-रेवस सागरी महामार्गाला जोडण्याची मागणी ते करणार आहेत.