सावंतवाडी : भाजपचे माजी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा ‘पुनःप्रवेश’ झाला. त्यांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. आज हे निलंबन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी रद्द केले.

​मागील ८ महिन्यांपूर्वी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली नसल्याने शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात विशाल परब यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना तब्बल ३४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे त्यांचे भाजप मधून निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. परब यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे या ‘घरवापसी’ला विशेष महत्त्व आले आहे.

सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासावरून काही गैरसमजांमुळे विशाल परब यांनी नाराज होऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महायुतीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निवडणूक हरल्यानंतरही त्यांची भाजपच्या विचार धारेवरील श्रद्धा कमी झाली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीकडून अनेक आमंत्रणे येऊनही त्यांनी ती धुडकावून लावली. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याची मोहीम सुरू केली आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून परब यांना पक्षात पुन्हा सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

​उद्योजक विशाल परब यांचा सावंतवाडी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संपर्क आहे. त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. त्यामुळे, त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला निश्चितच फायदा होणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, अशा सक्षम कार्यकर्त्यांच्या योगदानातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे कमळ पुन्हा एकदा जोरदार फुलेल.

​विशाल परब यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून, त्यांच्या या ‘घरवापसी’ला ‘घराला घरपण देणारी घरवापसी’ त्यांनी मानली आहे. या वेळी मुंबईत झालेल्या सोहळ्यात भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील, आमदार विक्रम पाचपुते, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ॲड. अनिल निरवडेकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.