नांदेड : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार-राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची पत्नी स्नेहलताताई (वय ८१) यांचे शुक्रवारी दुपारी येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी स्नेहलता खतगावकर यांना अतिसार झाल्यामुळे स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार केले; पण रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यामुळे उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्नेहलता खतगावकर या डॉ. शंकरराव आणि कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या. खासदार अशोक चव्हाण हे त्यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचा जन्म १९४४ साली हैदराबाद येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नांदेड तसेच मुंबई या ठिकाणी झाले. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. भास्करराव खतगावकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य नांदेडमध्येच राहिले.
माहेरी आणि सासरी राजकीय पार्श्वभूमी असतानाही त्या स्वतः राजकारणात आल्या नाहीत. नांदेड जिल्हा बँकेवर त्या काही काळ संचालक होत्या. काही वर्षे त्यांनी स्वतःचा पेट्रोलपंपही चालवला. पण मागील काही वर्षांपासून त्यांनी व्यवसाय थांबविला होता. त्यांच्या निधनाबद्दल खतगावकर-चव्हाण परिवाराच्या निकटवर्तीयांनी शोक व्यक्त केला आहे.