सोलापूर : अकलूजजवळ एका गावात शेतमजूर महिलांच्या टोळी मुकादम महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून झाल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी एका रिक्षाचालकास संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार घटनेची पार्श्वभूमी अशी – मृत शेतकऱ्याच्या शेतात काम करण्यासाठी महिला मजूर यायच्या. रिक्षाचालक असलेल्या तरुणावर त्यांना कामावर घेऊन येण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु काही दिवसांपासून महिला मजूर कामावर येण्याचे अचानक बंद झाले. त्यावर संबंधित रिक्षाचालकाला मृत शेतकऱ्याच्या मुलाने विचारले असता, त्याने महिला मजुरांच्या टोळीच्या महिला मुकादमाबरोबर त्याच्या वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचे सांगून त्याबद्दल वडिलांना जिवंत सोडणार नाही, असे धमकावले होते. दुसरीकडे संबंधित रिक्षाचालक आणि संबंधित महिलेचेही अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हा शेतकरी त्याच्या घरी झोपला असता, त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले. त्याचा चेहराही विद्रूप करण्यात आला होता. हा खून संबंधित रिक्षाचालक तरुणाने केल्याचा संशय मृत शेतकऱ्याच्या मुलाने घेतला असून, त्यानुसार त्याने अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.