सोलापूर : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांच्या सह्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आणाव्यात. मग मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सही आणून दाखवतो, असे अप्रत्यक्ष आव्हान बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिले आहे. फडणवीस हे केवळ ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना विनाकारण बदनाम करू नये. त्यांच्या विरोधात चाललेल्या अपप्रचाराला मराठा समाजानेही बळी पडू नये, तेही आवाहन त्यांनी केले आहे.
बार्शी तालुक्यात एका समारंभात बोलताना आमदार राऊत यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर थेट भाष्य केले. मराठा आरक्षण प्रश्नावर अलीकडे सतत जरांगे-पाटील यांच्या संपर्कात असलेले आमदार राऊत यांनी, उपमुख्यमंत्री फडवणीस यांची भूमिका मराठा आरक्षण विरोधात नाही. परंतु त्यांना विनाकारण बदनाम केले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
हेही वाचा – सांगली : येरळा नदीच्या पुरात वृद्ध दाम्पत्य बेपत्ता
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याबाबत कोणाचेही दुमत नसेल तर मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा दुसरे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मराठा ओबीसी आरक्षणासाठी पाठिंब्याकरिता सह्या आणाव्यात. दुसऱ्याच मुद्द्यावर भाष्य करू नये. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करून त्यांना बदनाम करू नये. मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाजूने पवार, ठाकरे, पटोले किंवा थोरात यांच्या सह्या मनोज जरांगे-पाटील यांनी आणून दिल्या तर आपण देवेंद्र फडणवीस यांचीही मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाजूने सही आणून देऊ. जर फडणवीस यांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाजूने सही दिली नाही तर त्यांच्याकडे आपण पुन्हा कधीही जाणार नाही, असेही आमदार राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून अलीकडे राजकारण वाढले आहे. यातून देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक लक्ष्य बनवून बदनामीचा डाव आखला जात आहे. मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांच्याविषयी कधीही टीकात्मक भाष्य करत नाहीत. केवळ फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडतात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. राज्याला फडणवीस आणि देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची अत्यंत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.