Heavy Rain Updates in Solapur : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. तसेच, उजनी धरणातून भीमा नदीत आणि सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर येथील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सीना – कोळेगाव, चांदणी, खासापुरी, भोगावती या धरणांतून सोडलेले पाणी येऊन मिसळत आहे. त्यामुळे नदीतून पाणी पात्राबाहेर आले आहे. तसेच करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसल्याने पुराचे संकट ओढवले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल रात्रीपासून अन्य जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्या आज दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला अधिक गती मिळणार आहे. त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले आहेत. एनडीआरएफचे पथक बचावासाठी गेले होते. परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना त्या नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे सैन्य दलाशी चर्चा करून त्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच लष्कराचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ‘एनडीआरएफ’चे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी मिळवले असून, ते पुढील दोन तासांत माढा येथील बचाव कार्यात सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. माढ्याचे आमदार अभिजित पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह पुरात अडकलेल्या नागरिकाना सुखरूप हलविणे, त्यांना मदत करण्यासाठी रात्रीपासून मदत कार्यात सहभागी आहेत.
संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापूराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०२१७ – २७३१०१२ या क्रमांकावर संपर्क साधून अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.