सोलापूर : चॅट जीपीटी, एआयच्या धर्तीवर आज व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाला महत्त्व असून, त्यासाठी अध्यापकांनी आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. शिक्षण आणि पदवीचा उपयोग केवळ नोकरीसाठी नव्हे, तर देशाच्या उन्नती आणि समृद्धीसाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन नवी दिल्लीच्या नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमच्या अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा वर्धापन दिन समारंभपूर्वक साजरा झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूरच्या पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शहा यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय अन्य विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
या वेळी मुंबईच्या एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आमदार गोपीचंद पडळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सोलापूरच्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कुलगुरू डॉ. बागला म्हणाल्या, ‘सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव मिळाले. ही खूप मोठी प्रेरणा आहे. तर, आमदार पडळकर म्हणाले, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. यापुढेही शेवटच्या घटकांपर्यंत विद्यापीठाने पोहोचले पाहिजे. या वेळी जीवनगौरव पुरस्कारप्राप्त मंगल शहा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वेबपेज लिंकचे अनावरण करण्यात आले.

कुलगुरू डॉ. महानगर यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यापीठाने सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक स्थलांतर रोखण्याची भूमिका बजावली आहे. अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प विद्यापीठाने हाती घेतले आहेत. पंढरपूरच्या आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र, तृतीयपंथी सेवा सुविधा केंद्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

यांचा या पुरस्काराने झाला सन्मान

  • १) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार : व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूर.
  • २) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर,
  • ३) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय) : डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर
  • ४) उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ) : राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
  • ५) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, वर्ग तीन : डॉ. शिरीष श्यामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
  • ६) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार : नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,
  • ७) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय) : राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरीराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब,
  • ८) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थ श्रेणी कर्मचारी महाविद्यालय) : दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय, सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.