सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बसना राज्य शासनाने पथकरात सवलत दिलेली आहे. मध्यरात्री कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, भुईंज पोलीस निरीक्षक रमेश गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवळला. आनेवाडी टोलनाक्यावरील सर्व मार्गिकेवर एसटी बस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला. शेकडो वाहने मध्यरात्री पुणे-सातारा मार्गिकेवर अडकून पडली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.

हेही वाचा >>> साताऱ्यात ‘मोरया’चा जयघोष, वाद्यांचा गजर; गणरायांचे उत्साहात स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या खासगी मोटारी, एसटी बस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच पथकरामधून राज्य शासनाकडून सूट देण्यात आली आहे. कोकणातील मार्गावर झालेली वाहनांची कोंडी, गर्दी आणि खराब रस्त्यांमुळे बहुसंख्य प्रवाशांनी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणे पसंत केले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी आहे. या वाहनांनाच काल मध्यरात्री साताऱ्याजवळील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी अडवल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई, पुण्याच्या बाजूकडून आलेल्या एसटी बस कोल्हापूर, कराडवरून खाली कोकणच्या दिशेने जाणार होत्या. या बस आनेवाडी टोल नाक्यावर रात्री आल्या. कर्मचाऱ्यांनी चालकांकडे टोलची मागणी केली असता, वाहक व चालकांनी कोकणात जाणाऱ्या या बस असून, टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र, टोल प्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणताही आदेश आला नसल्याचे सांगून टोलशिवाय जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूंनी कडक भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. टोलनाक्यावरील सर्वच मार्गिकेवर या एसटी बस थांबल्या होत्या. त्यांच्या मागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली होती. एसटीतील प्रवाशांनी आक्रमक होऊन वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. अखेर हे प्रकरण भुईंज पोलीस ठाण्यापर्यंत गेले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्याने अखेर तणाव निवळला.