कराड : राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या कोलमडलेल्या व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून, त्याला सर्वस्वी राज्य शासनच जबाबदार असल्याची टीका “कराड दक्षिण”चे आमदार तथा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या  रुग्णालयांमधील डॉक्टरांची पदे भरण्यात शासनाने गलथानपणा  केल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

नांदेडसह राज्यातील अन्य जिल्हा रुग्णालयांची अलीकडेच अपुरी व गैरव्यवस्था समोर येताना,  त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना जीव गमवावे लागलेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली . येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शेडगे, अन्य डॉक्टर्स व प्रशासनाकडून आढावा घेतला. अगदी शस्त्रक्रिया विभागाचीही पाहणी करुन, नेमकेपणाने त्यांनी माहिती घेतली. रुग्णालयाचा एकंदर आढावा घेतल्यानंतर येथील कमतरता, शासन व यंत्रणेचे आरोग्य व्यवस्थेकडील अक्षम्य दुर्लक्षासंदर्भात चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> सातारा: खंडेनवमी निमित्त किल्ले प्रतापगडावर उदयनराजे यांनी घेतले भवानी मातेचे दर्शन

चव्हाण म्हणाले की, शासकीय रुग्णालयांच्या दुरावस्थेचा प्रश्न केवळ कराड येथीलच नसून, संपूर्ण राज्याचा हा प्रश्न आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची पदे भरण्यात शासनाने गलथानपणा केलेला आहे. त्यामुळेच राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्य शासन – केंद्र सरकार काय दोन्ही सरकारला सगळीकडेच कंत्राटी पद्धत अवलंबावयाची आहे.

या रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. काही अन्य पदेही रिक्त आहेत. हा शासनाचा आरोग्य यंत्रणेबाबत अत्यंत बेजबाबदारपणा असल्याची नाराजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांची पुरेसा सेवक वर्ग व डॉक्टर्स नसल्याने गैरसोय होत असते. तरी पूर्णवेळ जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होणे गरजेचे आहे. तात्पुरती व्यवस्था किती दिवस अवलंबायची हा प्रश्न अनुत्तरित आहे. रुग्णालयाची इमारत ६० वर्षे जुनी असल्याने या इमारतीची डागडुजी करणे व कालांतराने नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले.

रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून, हा प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना त्यांनी दिल्या. या उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांचे रुग्णालय असून, सध्या १६४ खाटांद्वारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजून इथे ५० खाटांची मंजुरी अवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी  या वेळी दिल्या.

हेही वाचा >>> बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हावी; अजित पवारांची सूचना

उपजिल्हा रुग्णालयातील कमतरता अशा –

१) स्वच्छता सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी किमान १४ स्वच्छता सेवकांची आवश्यकता आहे.

२) कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे मे-२३ पासून सप्टें २३ अखेर (५ महिन्याचे) वेतन अनुदान प्राप्त नाही.

३) तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्ण तपासणीमध्ये अडचणी.

४) नियमित आरोग्य सेवेसाठी सुद्वा केवळ पाच वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) रुग्णवाहिका पाच आणि केवळ एकच कंत्राटी तत्वावरील वाहनचालक उपलब्ध. फक्त सोमवार व मंगळवार करिता पाटण येथील वाहन चालकाची नियुक्ती. त्यामूळे एक वाहन विनावापर पडून असल्याने रुग्णसेवेत अडथळा निर्माण होतो. ६) रुग्णवाहिके अभावी रुग्णांना बाळंतपणासह अन्य कारणांसाठी आणण्या – नेण्यासाठी सुविधा पूर्ण ताकदीने देता येत नाहीत.