महायुती सरकारने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळाची बैठक झाली. या बैठकीत वय वर्ष ६५ आणि अधिक वय असलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रुपये १० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील १४,३८७ चालकांना लाभ मिळणार असल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

ज्या चालकांनी कल्याण मंडळात किमान पाच वर्षांसाठी सदस्यपद घेतलेले आहे, अशाच चालकांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

राज्यात जवळपास ९ ते १० लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक आहेत. यापैकी अनेक चालक हे असंघटित असून ते कोणत्याही औपचारिक सामाजिक सुरक्षा लाभापासून दूर आहेत. चालकांना मदत करता यावी यासाठी राज्य सरकारने कल्ण मंडळाला ५० कोटीही देऊ केले आहेत.

प्रताप सरनाईक म्हणाले, निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सदस्य चालकांना रुपये १० हजार इतके अनुदान मिळेल. याशिवाय कल्याण मंडळ आरोग्य विमा, मृत्यू आणि अपंगत्व विमा, तसेच चालकांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप कार्यक्रमही जाहीर करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय अतिशय चांगले काम करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालक, चालक संघटना आणि रिक्षा स्टँड यांना त्याबद्दल वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्याची योजना आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आनंद दिघे यांच्या जयंतीदीनी म्हणजेच २७ जानेवारी रोजी “धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळा”ची स्थापना करण्यात आली होती. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना झाली.