Sudhir Mungantiwar on Devendra Fadnavis Swearing Ceremony : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज (गुरुवार, ५ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी होईल. त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यापैकी अजित पवारांचं नाव निश्चित असलं तरी एकनाथ शिंदेंबाबत अद्याप अनेकांच्या मनात साशंकता आहे. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आज तब्बल १२ दिवसांनी महायुती सत्तास्थापन करणार आहे. आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह २० ते २२ मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, तुर्तास इतर आमदार व नेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आज केवळ तिघांचाच शपथविधी होईल, असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. “आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होईल. त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडेल”, अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. “हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल”, असंही त्यांनी सांगितलं.

“एक कर्तबगार नेता व भाजपाचा सच्चा कार्यकर्ता, ज्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतूट विश्वास दाखवला आहे, तो नेता या महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून काम करेल, तेव्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पावर वेगाने पुढे जाईल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विश्वास दर्शवला. यावेळी मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं होतं की आज किती जणांचा शपथविधी होईल? त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “आज फक्त दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार एवढंच ठरलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कारण इतकी सर्व खाती तीनच जणांच्या हाती असतील तर अडचण होईल”.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीने नव्या सरकारमध्ये किती मंत्रीपदं मागितली? माजी खासदाराने नेमकी संख्याच सांगितली; शिवसेनेचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांच्या टीकेला मुनगंटीवारांचं उत्तर

दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना संपवून टाकेल असं वक्तव्य केलं आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले, “संजय राऊत यांना रोज सकाळी १० वाजता उठायचं आणि मीठ घेऊन जे जे नासवता येईल ते नासवायचं याशिवाय दुसरं काही येत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. मात्र ते महाविकास आघाडीला शिवसेनेला (ठाकरे) संपवतील यात मला शंका वाटत नाही”.