सांगली : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिल्याने बहुतांशी भागात उसाचे पीक घटले आहे. त्यात पुराचे पाणी बरेच दिवस ऊस पिकात साचून राहिल्याने उसाची वाढ खुंटली आहे. परिणामी क्षमतेप्रमाणे ऊस न मिळाल्यास हंगाम १०० दिवसांत आटोपता घ्यावा लागेल. हंगामाचा कालावधी कमी मिळाल्याने उत्पादन खर्च वाढून कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे मत क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले.
क्रांती कारखान्याचा २४ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा विजयादशमीच्या मुहुर्तावर पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. लाड म्हणाले, नैसर्गिक प्रतिकूलतेसह विविध समस्यांनी साखर उद्योग ग्रासला असला तरीही या परिस्थितींवर मात करीत क्रांती कारखाना चांगल्या स्थानावर आहोत. यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप करणार असून, क्रांती साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गळीतासाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होत असल्याने तयारीसाठी भरपूर वेळ मिळाला. जितके दिवस कारखाना चालेल त्यामध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे लागणार आहे. आपल्या कारखान्याची मांडणी व एकूणच व्यवस्थापन उत्कृष्ट असल्याने अनेक पुरस्कारांनी आपला सन्मान होतो, यामध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गाचे योगदान मोठे आहे.क्रांती साखर कारखान्याने चालू हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. क्रांती साखर कारखान्याने देशपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. मागील वर्षीचा हंगाम आव्हानात्मक असूनही ९ लाख ९१ हजार २९० टन उच्चांकी गाळप व १० लाख ८५ हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी प्रतिटन ३२०० रुपयांनी ऊस देयक देण्यात आले आहे.
सुमारे १६ हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे. सभासदांच्या सुख-दुखात कारखाना कायमच पाठीशी राहिला आहे. सभासदांचा विश्वास हीच आमची जबाबदारी आहे. एक सक्षम सहकारी संस्था म्हणून आपल्या क्रांती कारखान्याची ओळख आहे. मात्र अलीकडे सहकारी साखर कारखाने बंद पडत आहेत. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांना खासगी कारखान्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका ओळखून सभासदांनी सहकारी कारखानदारांच्या पाठीशी राहिले पाहिजे.
या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, अधिकारी- कर्मचारी वर्ग व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासो कोरे यांनी तर संचालक अनिल पवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले.