अलिबाग– अलिबाग तालुक्यातील थळ येथील ना विक्री कलमा अंतर्गत लागवडीसाठी मंजूर केलेली जमीन परस्पर विकल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. फळबाग लागवडीसाठी देण्यात आलेली ही जमीन अभिनेत्री सुहाना शाहरूख खान हिला विकण्यात आल्याने, या प्रकरणला महत्वप्राप्त झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२३ मध्ये नोंदणीकृत साठे कराराच्याव्दारे विक्री झालेल्या या जमिनीची दोन वर्षानंतर आता चौकशी सुरू केली आहे. अलिबाग तहसिलदारांना याबाबतचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
दक्षिण मुंबईला सागरी मार्गाने थेट जोडले गेल्याने, अलिबाग मधील जागा जमिनींना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. अनेक देशभरातील नामांकीतांनी अलिबाग मध्ये जागा जमिनींची खरेदी सुरू केली आहे. यात तारे तारकांचाही समावेश आहे. अभिनेता शाहरूख खान, जुही चावला, विराट कोहली, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग दिपीका पादुकोण, राम कपूर, अक्षय खन्ना, क्रिती सेनॉन यांच्या पाठोपाठ अभिनेत्री सुहाना शाहरुख खान हीने देखील अलिबाग तालुक्यातील थळ येथील जागा खरेदी केली होती. मात्र आता सुहाना खान हीने खरेदी केलेली जमिन वादात सापडली आहे. कारण १९६८ साली थळ येथील येथील सर्वे नंबर ३४५/२ मधील ०.६०.७० हेक्टर जमिन लागवड आणि वापरासाठी नारायण विश्वनाथ खोटे यांना शासनाकडून देण्यात आली होती.
जमिन देताना ही जमिन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय गाहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती. मात्र नारायण खोटे यांच्या वारसांनी अंजली खोटे, रेखा खोटे, प्रिया खोटे ही जमिन जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेताच परस्पर अभिनेत्री सुहाना खान हीला नोंदणीकृत साठे कराराव्दारे १२ कोटी ९१ लाख रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. या विक्री व्यवहारावर अलिबाग मधील अँड विवेक ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय हा साठेकरार झाला असल्याने, हा व्यवहार रद्द करावा, संबधितांवर कारवाई करावी आणि सदर जमिन अटी व शर्ती यांचा भंग केल्याने शासन जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे खोटे यांच्या वारसांनी ही जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यावर निर्णय दिला नव्हता, आता मात्र ही जमीन परस्पर अभिनेत्री सुहाना शाहरूख खान हीला साठे कराराने विकल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नोंदणीकृत साठेकरार रद्द करण्याची मागणी अँड विवेक ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन वर्षांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अलिबागच्या तहसिलदारांना या प्रकरणी दोन दिवसात वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी जारी केले आहेत.