परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हमखास यश मिळावे, या दृष्टीने नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
येथे आयोजित ‘निर्धार नव पर्वाचा’ या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकाही मतदान यंत्राच्या माध्यमातूनच झाल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे विरोधकांचे म्हणणे म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, विरोधकांनी खोटा अपप्रचार करून संभ्रम पेरण्याचे काम सुरू केले आहे. ही योजना बंद होणारच नाही, तर मानधनात वाढ होईल, असा विश्वासही खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडेंचे पक्षातले स्थान अबाधित
छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले आमदार धनंजय मुंडे यांचे पक्षातील योगदानाचा स्पष्टपणे उल्लेख करून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंडे यांचे पक्षातील स्थान अबाधित असल्याचे बोलताना सांगितले. ते बीडमध्ये पत्रकार बैठकीत रविवारी बोलत होते. मुंडे यांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा जवळ घेतले जाते का, या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, मुंडे यांचे पक्षासाठी योगदान आहे.
त्यांच्याकडे गुणवत्ता, संघटन कौशल्य आहे. त्यांच्यासोबत आपण अनेक दौरे केलेले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे काम प्रभावी राहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे पक्षातले स्थानही कायम आणि अबाधित असल्याचे सांगत तटकरे यांनी मुंडे यांना पाठबळच असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रूपाली चाकणकर, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
समन्वय समितीच्या बैठका
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन असून, त्यामध्ये आपण स्वत: व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, शंभुराज देसाई, उदय सामंत आदी नेते आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीत समितीच्या चार ते पाच बैठका झालेल्या आहेत. या बैठकीत महामंडळ वाटपावरही चर्चा झालेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा ही केवळ माध्यमातच आहे. प्रत्यक्षात काहीही नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या नेत्यांना विलीनीकरणाच्या संबंधी माहिती देऊ, या विधानावर सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या टीकेवर बोलताना तटकरे यांनी आपण ४१ वर्षांपासून राजकीय जीवनात असून, कुठे काय बोलायचे, त्याचे राजकीय अर्थ काय आहेत, याचे आपल्याला चांगले भान असून, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, मग बोलावे, असे प्रत्युत्तर दिले.