बीडमध्ये घरकूल मंजुरीसह त्याचे हफ्ते देण्यात यावेत या मागणीसाठी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या उपोषणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (४ डिसेंबर) सकाळी घडली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मृत्यूचा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीट करत मत मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “घरकुलाच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपोषणाची वेळीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच त्यांना प्राण गमावावे लागले. ही अतिशय गंभीर घटना आहे.”

“हक्काचे घर मागणाऱ्या गरीब व्यक्तीला शासनाच्या दाराशी प्राण गमावावे लागतात. ही बाब प्रचंड संतापजनक आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नम्र विनंती आहे की, कृपया या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासन प्रशासनातील व्यक्तींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (४ डिसेंबर) उपोषणार्थी अप्पाराव भुजंग पवार (वय ५८, रा. वासनवाडी ता.बीड ) यांचा उपोषणस्थळीच मृत्यू झाला. वासनवाडी शिवारातील जागेत हक्काच्या घरकुल मंजुरीसह थकीत हफ्ते तात्काळ देण्यात यावेत या मागणीसाठी पवार कुटुंबाने दि.2 डिसेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र प्रशासनाने निवेदन स्विकारण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून उपोषण सुरूच होते.

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बळी गेल्याचा आरोप

रविवारी सायंकाळी उपोषणार्थी अप्पाराव भुजंग यांची प्रकृती खालावली मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यातच रात्रभर कडाक्याच्या थंडीमुळे आज सकाळी अप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. सदरील प्रकार लक्षात येताच पवार कुटुंबीयांनी उपोषणस्थळीच टाहो फोडला. मृतदेहाभोवती गराडा घालुन बसलेल्या कुटुंबीयांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. यापूर्वीही घरकुल मागणीसाठी अनेकवेळा उपोषणे केली. तरीही न्याय मिळाला नाही मात्र आज त्याच न्याय हक्काची मागणी करत असताना कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

हेही वाचा : हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल

न्यायासाठी लढत असताना नातवानंतर आता पतीचा उपोषणस्थळीच मृत्यू

बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात पवार कुटुंब ३५ वर्षांपासून राहत आहे. २०२० साली त्यांना घरकुल मंजूर झाले. बांधकामासाठी पहिला हफ्ता देखील मिळाला मात्र त्यानंतरचे हफ्ते थकीत आहेत. शासनाने जागेचा पिटीआर दिला तशीही स्थानिक यंत्रणेने काम थांबविले. न्याय मिळावा म्हणून प्रशासन दरबारी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापूर्वी उपोषणस्थळीच सुनेची प्रसूती झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतांना नातवाचा डेंग्युमुळे तर आज पतीचा मृत्यू झाला तरीही न्याय मिळावा नसल्याचे कविता पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment on death of protester for house in beed pbs
First published on: 05-12-2022 at 15:36 IST