गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या, सुषमा अंधारे यांनी जरांगे-पाटलांना खडसावलं आहे. “जरांगे-पाटलांची भूमिका पाहून त्यांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याचं दिसत आहे. व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं त्यांना शोभत नाही,” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी जरांगे-पाटलांना सुनावलं आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “जरांगे-पाटील हे सुरूवातीला आरक्षणासाठी लढत असल्याचं निश्चित वाटत होतं. पण, अलीकडे त्यांची भूमिका पाहून आरक्षणावरील लक्ष्य विचलित झाल्याचं वाटत आहे. त्यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं शोभत नाही.”

हेही वाचा : “तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाईंचं नाव का नाही?” मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना थेट प्रश्न

“सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडली”

“एकीकडे मागास सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे १०० जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी १५० एकर मोसंबीची बाग तोडायची,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी टीका केली आहे.

“विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. यातून केंद्र सरकारच मार्ग काढू शकते. विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा,” अशी मागणी अंधारेंनी केली आहे.

“भाजपाला आरक्षण द्यायचं नाही”

“पण, केंद्र आणि राज्यातील भाजपा भांडण लावण्याचं काम करत आहे. कारण, महिला सुरक्षा, आरोग्यव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, कंत्राटी भर्ती, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थितीबाबत भाजपा अपयशी ठरली आहे. भाजपाने सगळे मुद्दे विचलित करून फक्त आरक्षणाच्या मुद्दा चर्चेत आणला आहे. भाजपाला आरक्षण द्यायचं नाही. फक्त जाती-जातींमध्ये भांडण लावायचं आहे,” असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.

हेही वाचा : “आईचं डोकं फुटलं आणि बाळाच्या अंगावर रक्त…”, मनोज जरांगेंनी सांगितला लाठीमारबाबतचा घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जरांगे-पाटलांनी जीव धोक्यात घालून आंदोलने केली”

जरांगे-पाटलांचा बोलविता धनी कुणी आहे का? असा प्रश्न विचारल्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “जरांगे-पाटलांनी जीव धोक्यात घालून आंदोलने केली आहेत. त्यामुळे जरांगे-पाटील कुणाचं ऐकून बोलत असतील, असं वाटत नाही. पण, समोरील गर्दी पाहून एखाद्याची मनस्थिती बदलू शकते. तेव्हा अशी विधान येऊ शकतात.”