Sushma Andhare Post on Murlidhar Mohol: पुणे जिल्ह्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सध्या पुण्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रोज नवनव्या आरोपांची राळ उठवली. त्यामुळे हे प्रकरण भाजपात वरपर्यंत गेल्याची चर्चा आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात त्यांचा काहीच सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. मात्र विरोधकांच्या टीकेची धार कमी झाली नाही. यातच आता सुषमा अंधारे यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.
सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ कोंडीत सापडल्याबद्दल त्यांना चिमटा काढणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये भाजपाच्या अनेक जुन्या नेत्यांचा उल्लेख आहे. जे एकतर अडगळीत गेले किंवा राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाले. या नेत्यांप्रमाणेच मोहोळ यांचेही होत आहे का? असा प्रश्नात्मक सूर सुषमा अंधारे यांच्या पोस्टमधून समोर आला आहे.
पार्श्वभूमी काय?
२०२४ साली महायुतीचे सरकार मोठ्या बहुमताने निवडून आले होते. भाजपाने विक्रमी जागा मिळवल्या होत्या. तर घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही अपेक्षापेक्षा चांगल्या जागा मिळाल्या. २०० हून अधिक आमदारांचे पाठबळ असतानाही मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर करायला बरेच दिवस लागले. यावेळी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यात एक नाव होते, मुरलीधर मोहोळ यांचे. स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी मात्र या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे सांगितले होते. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असेही ते म्हणाले होते.
सुषमा अंधारेंची पोस्ट काय?
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला’ यानंतर त्यांनी भाजपाच्या विविध नेत्यांचा उल्लेख केला. “सगळ्यात आधी विनोद तावडे, मग पंकजा मुंडे, पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय.
गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय. अब तेरा क्या होगा मुरली?”, अशी खोचक पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनाही टॅग केले आहे.

विशेष म्हणजे रवींद्र धंगेकर यांनीही अशाच आशयाची पोस्ट दोन दिवसांपूर्वी केली होती. ते म्हणाले, “२०२४ ला एक जण मिडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय.”
‘मुरलीधर मोहोळ यांची कानउघाडणी’
जैन बोर्डिंग प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची भेट झाली होती. या भेटीवरही रवींद्र धंगेकर यांनी खोचक पोस्ट केली होती.
“एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा” अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा…?”, अशी पोस्ट रवींद्र धंगेकर यांनी केली होती.
