सोलापूर : प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याचा त्यांच्याच घरात संशयास्पद मृत्यू झाला असून, पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर दुसऱ्या खोलीत स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तुळजापूर रस्त्यावरील उळे (ता. दक्षिण सोलापूर) गावात सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
गोपाळ लक्ष्मण गुंड (वय ३०) आणि त्याची पत्नी गायत्री गुंड (वय २२) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. गायत्री हिचा मृतदेह घरातील एका खोलीत आढळून आला. तर पती गोपाळ हा दोरीने गळफास घेऊन लटकत असलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच ते घटनास्थळी धावून आले. त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती कळविली.
गोपाळ आणि गायत्री यांचे मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद रुग्णालयातील पोलीस चौकीत झाली आहे.
दरम्यान, मृत गोपाळ याचे वडील लक्ष्मण गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ हा दुग्ध व्यवसाय करायचा. तो गायत्री हिच्या घरी नियमितपणे दूध घालत असे. त्यात ओळखीतून दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. नंतर दोघांनी अडीच वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र आळंदी येथील देवस्थानात जाऊन लग्न केले होते. परंतु, अलीकडे दोघात बेबनाव झाला होता. त्यातूनच गोपाळ आणि गायत्री यांचा शेवट झाला. आषाढी एकादशीनिमित्त आपण रात्री कीर्तन ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे घरी मुलगा आणि सून यांच्यात नेमका कोणता वाद झाला, याची माहिती नसल्याचे लक्ष्मण गुंड यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सोलापूर तालुका पोलीस करीत आहेत.