स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्च शहरांच्या यादीत नवी मुंबई हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, मध्य प्रदेश दुसऱ्या तर छत्तीसगढ तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई या शहराचा तिसरा क्रमांक आहे तर सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर या शहराची निवड झाली आहे. इंदूरने सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक मिळवण्याचं हे सलग सातवं वर्ष आहे. गुजरातमधलं सूरत हे शहर दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातल्या नवी मुंबईने स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहरं आणि राज्यांच्या प्रतिनिधींना पुरस्कार दिले आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत २०१६ मध्ये वार्षिक पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. २०२३ च्या पुरस्कारांमध्ये ४,४१६ शहरी स्थानिक संस्था, ६१ छावण्या आणि ८८ छोटी शहरे समाविष्ट आहेत.

गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (एमओएचयुए) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चा निकाल नुकताच जाहीर झाला. सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. सासवड व लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात आले.‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swachh survekshan awards 2023 maharashtra clean state number one in india indore surat and navi mumbai adjudged cleanest cities scj
First published on: 11-01-2024 at 13:22 IST