कराड : सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या थोडक्यातील कथानकामध्ये (ट्रेलर) आक्षेपार्ह बाबी आहेत. हंबीररावांचा  चेहरा व वंशावळ बदलण्याचा प्रयत्न होताना त्यांचे जन्मगाव तळबीड व येथील समाधीचा उल्लेख न केल्याच्या शक्यतेबाबत संताप व्यक्त करताना या चित्रपटात तत्काळ योग्य ते बदल न केल्यास चित्रपटाला आमचा विरोध असल्याचा इशारा तळबीड व वांगी ग्रामस्थांनी दिला.

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात महत्त्वाचे स्थान असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर चित्रपटाची निर्मितीची बाब अभिनंदनीय आहे. परंतु, चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व थोडक्यातील कथानकामध्ये हंबीररावांच्या कर्तृत्वाला न शोभणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्याने त्यावर कराड तालुक्यातील तळबीडच्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते म्हणाले, की ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान हंबीररावांचा इतिहास, कथा, पटकथा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सादरीकरणासंदर्भात तळबीड ग्रामस्थ व त्यांच्या थेट वंशजांबरोबर कोणतीही चर्चा व कसलीही परवानगी घेतली गेली नाही. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरसेनापतींच्या व्यक्तिमत्त्वाला न शोभणाऱ्या बाबी दिसून आल्याने  चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा कोणत्या इतिहासकारांना विचारून, कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर साकारली, या  उत्सुकतेपोटी आम्ही चित्रपटाचा प्रीमियर शो दाखवण्याची मागणी केली. परंतु, २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा २५ मे रोजी प्रीमियर शो दाखवू, असे निर्मात्यांने सांगितले. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे प्रीमियर शोमध्येही काही आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास त्या वगळून चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा म्हणून पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे तत्पूर्वी ग्रामस्थांना चित्रपटाचा प्रीमियर शो दाखवावा अशी मागणी असल्याचे जयवंत मोहिते यांनी सांगितले.  हंबीररावांच्या अग्नी समाधीच्या सुशोभीकरणावेळी इतिहास संशोधक, अभ्यासकांकडून हंबीररावांचे सर्वमान्य रेखाचित्र साकारण्यात आले. ते शासनमान्यही आहे. परंतु, काही जणांनी त्यांचा मूळ चेहरा बदलून मूर्ती बनवल्या. हंबीररावांची वंशावळही बदलण्याचा प्रयत्न झाला. ते सारे समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाल्याने याप्रकरणी तळबीड पोलिसात तक्रारही दिल्याचे तळबीडकरांनी सांगितले.