सातारा : कराड येथील तासवडे औद्योगिक वसाहतीत शेतीचे खते बनवण्याचा बहाणा करणाऱ्या सूर्यप्रभा फाॅर्म केम कंपनीतून ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. या कारवाई वेळी कमालीची गोपनीयता पाळून कराड तळबीड पोलिसांनी १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीत ही कंपनी असून, येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तासवडे एमआयडीसी हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख (नांदगाव, ता. सातारा) यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत ६ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचे १२७० ग्रॅमच्या कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव), समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी मलकापूर, कराड), रमेश शंकर पाटील (मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण ( आवार्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर ( दौंड, पुणे) यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही दोशी यांनी सांगितले.
सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात, असे सांगितले जात होते. त्यानंतर सहायक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ॲसिटिक ॲसिड असल्याचे सांगण्यात आले. कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्यांची पाहणी केली. त्यामध्ये स्फटिक सारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन १३७० ग्रॅम असून, सदरचे कोकेन सहा कोटी ३५ लाखांचे असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.