सातारा : सातारा-सांगली मार्गावरील पुसेसावळी रस्त्यावर खड्ड्यातून मार्ग काढताना टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुसेसावळी ते गोरेगाव-वांगी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या मार्गावरून मालवाहतूक करणारा टेम्पो (एम.एच. ०९ क्यू ३९१४) जात होता. खड्डे चुकवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटला.
मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे अधिकच घातक ठरत आहेत. या रस्त्यावर काही ठिकाणी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, ही उपाययोजना अपुरी आणि अल्पकालीन ठरली. परिणामी, वाहनधारकांचा त्रास कायम आहे.
रस्त्यावरील खड्डेमय स्थिती आणि सतत होणारे अपघात यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ताबडतोबीने रस्ता दुरुस्त करावा, अशी वाहनचालकांनी मागणी केली आहे.