लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्य्यातील मतदान आज पार पडत आहे. तर सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान झालेलं आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठका घेत आहेत. तसेच मान्सूनपूर्व कामाचा आढावाही त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा घेणारी बैठक घेतली.

त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मी लंडनला जाऊ शकत नाही, मला राज्यात काम करावं लागतं, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं’, असा खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा : पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “घरात पैसा जास्त झाला की रस्त्यावर…”

सुनील राऊत काय म्हणाले?

“लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. तेथे मराठी आणि हिंदी भाषेत बोलणार का? ज्यांना लंडनला पोहोचता येत नाही तेच असं म्हणतात. मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना आंगण वाकडे, त्यांनी लंडनला जावं. का जाऊ नये? मात्र, त्यांना माहिती आहे जर लंडनला गेलोत तर बाकीच्या ४० गद्दारांमध्ये फाटाफूट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनला काय महाराष्ट्राच्या बाहेरही पडू शकत नाहीत”, अशी खोचक टीका आमदार सुनील राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

“मी छत्रपती संभाजीनगरला बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत महापालिकेच्या बैठकीला आलो. दोन दिवसांनतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाची एक महत्वाची बैठक आहे. आता मान्सून पूर्व जी काळजी घ्यायला हवी ती घेतलीच पाहिजे. मी लंडनला जाऊ शकत नाही. मला मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे काम करावंच लागेल”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या फूटीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपासह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे.