इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) चक्क साप सोडला. वीजप्रश्नी राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हा भाग असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी झालेल्या आंदोलकांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू केले आहे. काल शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसमोर काचेच्या बरणीतून साप ठेवण्यात आला होता. तर आज त्याही पुढे जात इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडण्यात आला. वीजप्रश्नी तातडीने निर्णय न घेतल्यास सापासह अन्य वन्य प्राणी शासकीय कार्यालयात सोडले जातील असा इशारा आंदोलकांनी दिला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्याने पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र

या वेळी आंदोलनात बसगोंडा बिरादार, संजय बेडक्याळे, गोवर्धन दबडे, पुरंदर पाटील, अभिषेक पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर शिरोळ तहसील कार्यालयामध्ये एका शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारातून साप सोडला. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.

आंदोलकांवर गुन्हा दाखल –

दरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सरकारी कार्यालयात साप सोडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संजय बेडक्याळे, पुरंदर पाटील, अभिषेक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनात पकडण्यात आलेला साप पोलिसांनी जप्त केला असून, तो वन विभागाकडे अधिवासात सोडण्यासाठी सुपूर्द केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The activists of the farmers association released the snake on the table of the msedcl officer msr
First published on: 26-02-2022 at 19:35 IST