सोलापूर : पंढरपुरातील आषाढी वारी संपताच मंगळवारी सकाळपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. उजनी धरणासह नीरा खोऱ्यातील वीर धरणातूनही भीमा नदीच्या पात्रात २१ हजार २९० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यंदा प्रथमच उन्हाळ्यात मे महिन्यात पावसाच्या कोसळधारा सुरू झाल्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा ७९ टक्क्यांवर असताना, पुन्हा जोरदार पाऊस कोसळल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे आवश्यक होते. परंतु, पंढरपुरातील आषाढी वारीसाठी चंद्रभागा नदीकाठी लाखो वारकरी, भाविकांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे वारीचे नियोजन करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी, पंढरपुरात भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, विशेषतः चंद्रभागेचा वाळवंट वारकरी आणि भाविकांसाठी रिकामा राहावा, यासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले.
त्यानुसार धरणातील पाणी भीमा नदीत सोडणे थांबविण्यात आले होते. त्याच वेळी धरण ७९ टक्के भरले असताना धरणात पुण्यातील खडकवासला आणि दौंडमार्गे येणारी पाण्याची आवक वाढतच होती. वारीच्या काळात भीमा नदीत उजनी धरणातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे वारी लाखो वारकरी आणि भाविकांसाठी सुकर झाली. वारी संपताच प्रशासनाने उजनी धरणात आणखी वाढलेला पाणीसाठा पाहता धरणातून मंगळवारी सकाळपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली.
सकाळी दहा वाजता धरणातून १० हजार क्युसेक आणि धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. दुसरीकडे नीरा खोऱ्यातील वीर धरणातून नदीपात्रात ९६९६ क्युसेक विसर्ग असा मिळून २१ हजार २९० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले.
या पार्श्वभूमीवर उजनी धरणात एकूण ११० टीएमसी पाणीसाठा वाढला होता. यात उपयुक्त पाणीसाठा ४६.९७ टीएमसी (८७.३८ टक्के) इतका होता. उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून येणारी पाण्याची मोठी आवक पाहता धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. त्याचा अंदाज घेऊन धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. दरम्यान, भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसे पत्र जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे.