राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. भाजपा या मुद्यावर आक्रमक झाली असून, महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करण्यात आलेले आहेत. तसेच, या प्रकरणी महाविकासाघाडी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही दमबाजीचा असुन, किशोर वाघ यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा राजकीय सूड भावनेचा प्रकार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघडी सरकारवर निशाणा साधला आहे. “चित्राताई वाघ या लढवय्या नेत्या आहेत. त्यांच्या पतीवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूड भावनेचा प्रकार! संपूर्ण भाजपा चित्रा ताईंच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे.” असा दरेकर यांनी आरोप केला आहे.

तसेच, “तुम्ही जेवढा त्रास द्यालं, तेवढ्याच अधिक हिमतीने आणि ताकदीने चित्राताई आपली बाजू भक्कमपणे मांडतील. कारण महाराष्ट्रातील जनतेला सत्य समजायला हवं!, यासाठी आणि पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रा ताई काम करतायत. त्यामुळे संशयित आरोपी असलेल्या मंत्र्याला अभय द्यायचं?, की पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवावं. शेवटी राज्यातील जनता सर्वकाही बघते आहे.” असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून सेवेत होते. १९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉडच्या शस्त्रक्रियेदरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती, असा आरोप तक्रारदाराने केला होता. तशी तक्रारही त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.