छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर शहरातील सूतमिल परिसरातील एका घरातून मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. १६.३६ ग्राम वजनाच्या या पदार्थाची बाजारातील किंमत ८१ हजार ८०० रुपये असून, याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले की, विशेष तपासणी मोहीम सुरू असताना शहरातील सूतमिल रोड परिसरातील एका घरातून अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन गुरुवारी रात्री तेथे धाड टाकली असता तेथे अनुप सोनवणे (रा. निगडी, पुणे. सध्या सूतमिल रोड, लातूर) त्याची पत्नी आणि ऋषिकेश राठोड (२८, रा. नाथनगर लातूर), संयम बालाजी पडिले ( २६, बिदर रोड उदगीर) हे चौघे जण आढळून आले. त्यांच्याकडून विक्री करण्याच्या उद्देशाने आणलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, अनुप सोनवणे फरार झाला आहे.