नांदेड: देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या स्वातंत्र्यसैनिकांचा मान-सन्मान राखण्याचा प्रयत्न शासन, न्यायपालिका आणि विवेकी घटकांकडून होत असताना हैदराबाद मुक्तिसंग्रामात ऐतिहासिक योगदान देणार्या नांदेडमध्ये मनपाच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात साकारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचा ओटा आणि त्या परिसरात गेल्या गुरुवारी एका वाढदिवसाच्या निमित्ताने ओली पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची मनपा आयुक्तांनी आता गंभीर दखल घेतली आहे.
शहराच्या उत्तर भागात अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वरील उद्यानात नांदेडमधील शेकडो नागरिक सकाळी फिरायला जात असतात. छायाचित्रकार भारत होकर्णे व त्यांचे काही सहकारीही नित्यनेमाने तेथे जातात. शुक्रवारी सकाळी ते या उद्यानात फिरायला गेलेले असताना हुतात्मा स्मारकाच्या परिसरात आदल्या दिवशी झालेल्या एका वाढदिवसाच्या ओल्या पार्टीचे अवशेष दिसून आल्यानंतर त्यांची छायाचित्रे त्यांनी काढून ठेवली.
वाढदिवस कोणाचा होता, तो कोणी साजरा केला, ते अद्याप समोर आलेले नाही; पण शुक्रवारी सकाळी हुतात्मा स्मारकासमोर वाढदिवसाचा केक, बिर्याणी खावून तेथेच सोडून दिलेल्या कागदी पत्रावळ्या आणि दारुच्या काही बाटल्या दिसून आल्या. शुक्रवारी नांदेडमध्ये बंद पाळण्यात आला होता. या धामधूमीत मनपाच्या यंत्रणेचे हुतात्मा स्मारक परिसरातील प्रकाराकडे लक्ष गेले नाही. पण शनिवारीही हुतात्मा स्मारकाचा ओटा तशाच स्थितीत होता.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेले मराठवाडा गीतही तेथे कोरण्यात आलेले आहे. अशा पवित्र ठिकाणी कोणा अज्ञाताच्या वाढदिवसानिमित्त मद्यप्रेमींनी उच्छाद मांडला होता. पण दोन दिवसांत मनपाच्या संंबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष गेले नाही.
नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात सायंकाळनंतर रस्त्याच्या लगतच दारुच्या पार्ट्या रंगतात, असे निदर्शनास आल्यानंतर पोलीस यंत्रणेने सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांविरुद्ध मध्यंतरी मोहीम राबविली. या पार्श्वभूमीवर तळीरामांनी आपला मोर्चा शहराबाहेर झाडीझुडपात वळवला. या नव्या प्रकारामुळे गेल्या दोन महिन्यांत आगीच्या १४ घटनांची नोंद झाल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागप्रमुखांनी गेल्या आठवड्यातच दिली होती. हुतात्मा स्मारक आतापर्यंत सुरक्षित समजले जात होते. पण गेल्या गुरुवारी तेथे ओली पार्टी झाल्याचे ढळढळीत पुरावे छायाचित्रकार होकर्णे यांनी आपल्या कॅमेर्यात बंदिस्त करतानाच मनपाने या प्रकाराची गंभीर नोंद घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नांदेड मनपाच्या उद्यानातील हुतात्मा स्मारकाच्या परिसरात वाढदिवसानिमित्त ओली पार्टी झाली, ही बाब आमच्या निदर्शनास कोणीही आणून दिलेली नाही. उपलब्ध झालेली छायाचित्रे पाहून तसेच आवश्यक ती माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे मनपा उद्यानात असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल. – डॉ.महेशकुमार डोईफोडे, आयुक्त, नांदेड-वाघाळा मनपा