कराड : छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जात असलेल्या कराडच्या श्री शंभूतीर्थ परिसराला विद्युत वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे जाळे (स्ट्रक्चर) तातडीने स्थलांतरित करावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. तिला मान्यता देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या या भव्य स्मारकासाठी आठ कोटींचा निधी दिला. हे काम प्रगतिपथावर आहे. पण, त्याला विद्युत तारांचा अडथळा निर्माण झाल्याने ते रखडल्याची बाब आमदार डॉ. भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी वीज कंपनीच्या देखभाल-दुरुस्ती खर्चातून या विद्युत तारांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे स्मारकाचे काम गतीने पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
वानरवाडी बंधाऱ्यासाठी संयुक्त बैठक
वानरवाडी बंधाऱ्यांचा प्रश्न आमदार भोसल्यांनी मांडला. बंधाऱ्याचे काम झाले आहे. मात्र, सांडव्याचे काम रखडले असून, त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील जमीन घ्यावी लागणार आहे. ती तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आमदार भोसल्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले.