Sharad Pawar On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून आज (३० ऑगस्ट) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी राज्य सरकारच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. दरम्यान, आता मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. तामिळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित करत घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“आरक्षणाचे असे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. यामध्ये केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडवण्याच्या संबंधी निर्णय संसदेत घेतला पाहिजे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“आम्ही संसदेच्या काही सदस्यांबरोबर संवाद साधत आहोत. निलेश लंकेही या ठिकाणी आहेत, आमची आणि आणखी काही सहकाऱ्यांची एक बैठकही झाली. जर गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्याच्या घटकांना पटवून दिली तर कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही. प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत. शेतकरी वर्ग आहेत. त्यामुळे घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना काय इशारा दिला?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसांपासून आपोआप तोंडाला पाणी येण्यास सुरूवात होते. पण आज ते दुसऱ्या दिवसांपासून सुरू झालंय. कारण दोन दिवसांपासून प्रवास आणि दोन दिवसांपासून उपोषण. त्यामुळे शरीरावर परिणाम होतोय. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सरकारला आमचं सांगण आहे, मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सन्मान द्या, आमचा अपमान करू नका”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“हॉटेल बंद करायला लावले, पाणी बंद करायला लावले, म्हणून मराठा आंदोलक संतापले आहेत. मराठा आंदोलक वैतागावेत म्हणून जर तुमची ही भावना असेल तर मग भाजपामधील मराठा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की तुमचे मुख्यमंत्री गोरगरिब आंदोलकांना मुंबईत आल्यानंतर किती त्रास देत आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकावा, तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही मराठ्यांची मने जिंका. मराठा समाजाला आरक्षण द्या. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटेल की तुम्ही लाठीचार्ज वैगेरे कराल तर तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस तो असेल. कारण तुमच्यामुळे अमित शाह आणि मोदींनाही अडचण होईल. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे. पण आमच्या आंदोलकांना बोट लागता कामा नये. पुन्हा राज्य अस्थिर करू नका. जर राज्य अस्थिर झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री असतील. फक्त मुंबई तुमची नाही. फक्त मुंबईने तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तर अवघ्या महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे तुम्ही अशी दुही निर्माण करू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.