scorecardresearch

“… हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी समजून घेतला पाहिजे” ; संजय राऊत यांनी साधला निशाणा!

“दिल्लीच्या तख्ताचा वापर करून महाराष्ट्राला आम्ही झुकवू असं जर कोणाला वाटत असेल तर… ”, असं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

Sanjay raut
(संग्रहीत छायाचित्र)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (सोमवार) माध्यमांशी बोलताना केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने यावरून बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना एक धडा ४०० वर्षांपूर्वी जो शिकवला, तो असा आहे. की महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि शत्रू जर अंगावर आला. तर त्याची बोटं छाटली जातील. प्रतापगडावर तर अफजल खानाचा कोथळाच निघाला आणि २५ वर्षे लढून देखील औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्कारावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला देशाला माहीत आहे. हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी समजून घेतला पाहिजे. ” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीच्या तख्ताचा वापर करून महाराष्ट्राला झुकवू…. –

तसेच, “शिवसेनेा विशेष करून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो फडकतोय आणि आज सगळ्यांना अचानक जे भगव्याचं प्रेम उफाळून आलय. त्याचे प्रमुख जे प्रेरकर होते, ते अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्तं त्याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही झुकवू, गुडघे टेकायला लावू पण त्यांनी एकदा आजचा अग्रलेख तर वाचायलाच हवा आणि त्यांना शिवचरित्र वाचावं लागेल. ” असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच –

याचबरोबर, “मी आजच पाहीलं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी आज दिल्लीमध्ये बोलावलं आहे आणि त्याच्यावर चौकशीचा ससेमीरा सुरू केला. महाराष्ट्रात देखील तेच सुरू आहे. परंतु बॅनर्जींनी सांगितलं आहे की मी दिल्लीच्या सत्तेसमोर झुकणार नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे. क्रांतीकारकांची आणि लढणाऱ्यांची ही राज्ये आहेत, ही दोन्ही राज्ये झुकणार नाहीत. ” असंही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटलं.

म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी इतर राज्यांना केवळ भूगोल –

तर, “छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत, महाराष्ट्रात जन्म घेतला हे महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले, म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी इतर राज्यांना केवळ भूगोल आहे. हे विसरलं नाही पाहिजे. छत्रपती महाराजांच्या नावाने ज्यांना काही राजकारण करायचं आहे, त्यांनी ते करावं छत्रपती शिवाजी महाराजाचं व्यक्तिमत्व इतकं थोर आणि महान आहे, की त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे. ” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This lesson should be understood by the enemies of shiv sena and maharashtra sanjay raut msr

ताज्या बातम्या