कराड : भाजपाच्या हुकूमशाही कारभारामुळे संविधान, लोकशाही अन् देश धोक्यात आला आहे. पुन्हा जातीभेदावर आधारित व्यवस्था आणण्याचे काम होत असल्याने या विरुद्ध गाफील न राहता सर्वांनी मिळून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची ही वेळ असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराडमध्ये काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, गौतम अदानी यांच्या मायाजालाचे पुरावे जगजाहीर झाल्यामुळे अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीतून देश विकला जात असल्याच्या संशयाचे चित्र निर्माण झाले आहे. एक सामान्य उद्योजक असलेले अदानी सर्वाधिक श्रीमंत उद्योजक झाले कसे? असा सर्वांचा प्रश्न आहे. तर, अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने अदानींच्या मायाजालाचे पुरावे जगजाहीर केल्याने काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार या सर्व प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी केली जावी आणि म्हणूनच उद्या काँग्रेसकडून देशभर आंदोलन छेडले जाणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – “बाळासाहेब थोरातांनीच खरं काय सांगावे,” काँग्रेसमधील वादावर छगन भुजबळ यांचा सल्ला

राहुल गांधींच्या पुढाकाराने भारत जोडो यात्रेतून देशभरातील द्वेषाचे वातावरण हटविण्याचे काम होताना काँग्रेसचा बंधुता, देशप्रेमाचा विचार सर्वत्र निर्माण करता आला. आता मोदी सरकारच्या आठ वर्षांतील चुकीच्या निर्णयांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान प्रभावी ठरेल. काँग्रेसने संविधान आणले. त्यामुळे संविधान वाचवण्याचे कामही काँग्रेससह जनतेला करावे लागेल. त्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन पृथ्वीराज यांनी केले.

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशाजवळ अपघात, सर्वजण सुरक्षित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतेज पाटील म्हणाले, की एकतर्फी ‘मन की बात’ न करता लोकांच्या मनातील बात ऐकायला राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता लोकांनी ‘हाथ से हाथ जोडो’च्या माध्यमातून आणखी बळ द्यावे. कार्यक्रमात अ‍ॅड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे आदींची भाषणे झाली. दरम्यान, ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान शुभारंभापूर्वी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला.