नांदेड : नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शुक्रवारी (दि. ४) झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सात महिलांवर गुंज (ता. वसमत) येथे रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात लिंबगाव पोलिसांनी ट्रॅक्टरचालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शनिवारी खासदार रवींद्र चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या प्रकरणात ट्रॅक्टरमालक दगडू शिंदे व चालक नागेश आवटे या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर फरार झालेला ट्रॅक्टरचालक गिरगाव (ता. वसमत) येथे लपला होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. आज न्यायालयापुढे उभे केले असता त्याला कोठडी दिली आहे. लिंबगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर व त्यांच्या चमूने ही कारवाई केली आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करताना अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी होईल, तसेच दोषीविरुद्ध कारवाई होईल, अशा शब्दांत त्यांनी आश्वस्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख व पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत सत्वर देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

विहिरींच्या सर्वेक्षणाचा आदेश

आलेगावच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व विहिरींचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. ज्या विहिरींना कठडे नाहीत किंवा ज्या विहिरी पारंपरिक, शासकीय योजनेतील आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे. नांदेडच्या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे पुण्यात होते. त्यांनी घटनेची इत्थंभूत माहिती घेतल्यानंतर सर्व तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या मदतीचा प्रस्ताव हिंगोली जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहे. आम्ही आवश्यक ती कागदपत्रे, शिवाय पोलीस ठाण्यातील कारवाईची माहिती हिंगोली प्रशासनाला कळविली आहे. या प्रकरणात संबंधित दोषींना अटक झाली आहे. शिवाय, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले.