इस्लामपूरमध्ये जुळय़ांचा आविष्कार सादर

सांगली : एकाच वेळी विविध वयोगटातील जुळय़ांना पाहणे हा दुर्मीळ योगायोग इस्लामपूरमध्ये मंगळवारी साधण्यात आला. इस्लामपूरच्या मुक्तांगण प्ले स्कूलच्या प्रांगणात तब्बल ३५ जुळी व्यासपीठावर आली. त्यांनी आपल्या कला सादर केल्या. चेहऱ्यातील प्रचंड साम्य आणि विविध वेशभूषेत आलेल्या जुळय़ांचा आविष्कार पाहून कार्यक्रमात रंगत आली.

इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल मुलांचे बालपण टिकवण्यासाठी गेली ११ वर्षे प्रयत्न करीत आहे. मंगळवारी असणारी २२-२-२२ या तारखेचे औचित्य साधून समाज माध्यमावर जुळय़ांना आमंत्रित करण्यात आले हेते. या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. नुकत्याच जन्मलेल्या बालकापासून ते ५५ वर्षे वयाच्या व्यक्ती या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. एकाच वेळी आलेली जुळी पाहायला उत्सुकताही मोठी होती. जुळय़ांच्या या अनोख्या संमेलनात गणेश, स्वरा व सई कुंभार या तिळय़ांचा सहभाग लक्ष्यवेधी ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निमित्ताने जुळय़ासाठी योग, नृत्य, नाटय़, बडबडगीते, पोवाडा, पसायदान, बालगीते यांची मुक्त उधळण मुक्तांगणच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या शामियानात करण्यात आली.उपक्रमाबाबत मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते म्हणाले, अनोख्या तारखेला एकाच व्यासपीठावर जुळी आणण्याचा प्रयत्न होता. मुक्तांगणच्या संचालिका वर्षांराणी मोहिते म्हणाल्या, अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस मुक्तांगण मुळे जुळय़ांना दीर्घकाळ लक्षात राहील. खुर्षद पटवेकर,धनश्री पाटील,भारती उथळे, आरती धोतरे यांनी संयोजन केले.