चिपळूण : जास्त व्याजाचे आमिष दाखवून २८ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक करणाऱ्या टिडब्ल्यूजे असोसिएशन कंपनीवर चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील गुंतवणुकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या कंपनीवर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. २०१८ पासून चिपळूण गुहागर दापोली या ठिकाणी शाखा कार्यालय असलेल्या या कंपनीने तब्बल बाराशे कोटीच्या ठेवी गोळा केल्या आहे. मात्र ठेवीदारांना त्यांचा परतावा वेळेवर दिला गेला नाही. 

शेअर मार्केट गुंतवणूक प्रशिक्षण देतो, संपूर्ण महाराष्ट्रात सोळा शाखा आहेत, शासनाच्या विविध प्रकल्पात आमचे मोठे कंत्राट असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणुकीवर तीन ते चार टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले आणि नागरिकांकडून कोट्यावधी  रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आता कामगारांचे पगार थकले आहेत. शाखा कार्यालय बंद आहेत, संचालक ठेवीदारांना उपलब्ध होत नाहीत. यापूर्वी तालुक्यातील काही ठेवेदारांनी कंपनीवर धडक देऊन आपल्या ठेवी परत मागितल्या होत्या. त्यांना आश्वासन देण्यात आले होते.

मात्र आता त्याचीही पूर्तता होत नसल्यामुळे ठेवीदारांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. कामथे येथील प्रतीक दिलीप माटे यांनी या कंपनीच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२३ मध्ये माटे यांना ठेवीवर पाच टक्के व्याज देण्याचे आम्ही देण्यात आले होते त्यातून त्यांनी साडेतीन लाखाची आणि त्यांची बहीण तृप्ती माटे हिने २५ लाखाची गुंतवणूक केली होती. मात्र त्यांना वेळेवर परतावा भेटला नाही म्हणून  चिपळूण पोलीस ठाण्यात टिडब्ल्यूजे असोसिएशन कंपनीचे समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, संकेत घाग आणि सुरज कदम आदींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.