श्रीरामपूर, सांगलीतील घटना, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर जिल्ह्य़ातील श्रारामपूर आणि सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यात औषध फवारणी करीत असताना शेतक ऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रदीप उंडे आणि दादासाहेब चौगुले अशी या मृत शोतक ऱ्यांची नावे आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात मातापूर गावी डाळिंबाच्या बागेत औषध फवारणीचे काम सुरू असताना अचानक प्रकृती बिघडल्याने उंडे (वय ३५) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उंडे हे कृषी विभागाचे संपर्क शेतकरी असून कीटकनाशकाची फवारणी कशी करायची याचे मार्गदर्शन ते करत. यवतमाळ येथील विष दुर्घटनेनंतर त्यांच्या शेतावर कृषी खात्याने कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. त्यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

उंडे यांनी न्युओथ्रीन हे कीटकनाशक व कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक एकत्र करून फवारले होते. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी विषाच्या रिकाम्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत. तसेच श्रीरामपूर येथील एका कृषी सेवा केंद्रातून संबंधीत कीटकनाशक व बुरशीनाशके ताब्यात घेतले. त्याच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. ही औषधे बहुराष्ट्रीय कंपन्यांची असून त्याची योग्य प्रकारे नोंद ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

सांगलीतही मृत्यू

दरम्यान सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे द्राक्षबागेत औषध फवारणी करीत असताना दादासाहेब चौगुले या तरुण शेतकऱ्याचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे वैद्यकीय पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. दादासाहेब चौगुले यांची मल्लेवाडी येथे मिरज रोडवर द्राक्षबाग असून खराब हवामानामुळे शुक्रवारी सायंकाळी द्राक्षबागेत औषध फवारणी करीत होते. या वेळी अचानक त्यांना चक्कर आल्याने अन्य काम करीत असलेल्या मजुरांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी मिरजेच्या रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता चौगुले यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाल्याचे निष्पन्न झाले असून तसा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तरीही व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two farmers died after spraying insecticide on crops
First published on: 15-10-2017 at 02:47 IST