खासदार उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं काळाच्या पडद्याआड जाणं मनाला चटका लावणारं असल्याची भावना व्यक्त केलीय. तसेच सातारच्या छत्रपती घराण्याशी बाबासाहेबांचा वेगळाच ऋणानुबंध होता, असं म्हटलं. यावेळी उदयनराजेंनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवशाहीर पदवीबाबतची एक खास आठवण सांगितली.

उदयनराजे भोसले म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे यांना ‘शिवशाहीर’ ही पदवी आमच्या आजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच साताऱ्यात सन्मानानं बहाल केली होती.”

“बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रबिंदू मानून संपूर्ण आयुष्य वेचलंय. बाबासाहेबांच्या नसानसात, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज होते. सध्या सोशल मीडिया झपाट्यानं वाढलाय, पण या आधी सोशल मीडियाचं साम्राज्य इतकं नव्हतं. त्यावेळी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचवलं. त्यांच्या अशा जाण्यानं राज्याची मोठी हानी झालीय,” अशी भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

“बाबासाहेबांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणार”

उदयनराजे म्हणाले, “बाबासाहेबांच्या संकल्पनेतून साकारत होत असलेल्या शिवसृष्टीची निर्मिती लवकरात-लवकर व्हावी, यासाठी मी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. त्यांची शिवसृष्टीची इच्छा लवकर पूर्ण होऊन त्याला जास्तीत-जास्त निधी मिळावा, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.”

हेही वाचा : Photos : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अखेरच्या दर्शनाला दिग्गज नेत्यांपासून कलाकार हजर, महिला पोलीस पथकाकडून मानवंदना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत,” असेही खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे.