Udayanraje Bhosale : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच या कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती सांगितली आहे.

उदयनराजे भोसले काय म्हणाले?

“लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लोकांना एकत्रित केलं आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. बाहेरून होणारे आक्रमण महाराजांनी परतवून लावले. हे कोणाच्या जोरावर? सर्व समाजाच्या जोरावर स्वराज्याला योग्य दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण आज त्यांच्यामुळे मोकळा श्वास घेत आहोत. पण आज काय चाललंय? आज आपण लोकशाहीत वावरत आहोत. पण कोणीही उठायचं आणि काहीही वक्तव्य करायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मग सांगितलं जात की कारवाई केली जाईल. या लोकशाहीत केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जातात”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

“आता सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या काळात माझं प्रामाणिक मत आहे की एक विशेष कायदा पास केला पाहिजे. कायदा असा पाहिजे की परत कोणी काही बोलण्याचं धाडस केलं नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचं कोणी धाडस करता कामा नये. याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा आणि जास्तित जास्त रुपयांचा दंड झाला पाहिजे, अशी तरतूद करण्याची गरज आहे. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे, अशीही तरतूद असली पाहिजे. तसेच अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान ३० दिवसांत दाखल झालं पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे, असा कायदा केला पाहिजे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल”

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर कुठेतरी काही वक्तव्य केलं जातं, त्या ठिकाणी दुसरा देखील विचार केला पाहिजे. काही ठिकाणी दंगली घडतात. तेढ निर्माण होतो. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. पण हे सर्व थांबण्याचं काम फक्त सत्ताधारी यांचं आणि विरोधकांचं काम नाही, तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांचं हे काम आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी याच अधिवेशनात विशेष कायदा पारित करावा. ही मागणी मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने करत आहे. हा कायदा केला पाहिजे, नाही केला तर गोंधळ होतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सभागृहात देखील याच विषयावरून गोंधळ होतो ना? मग हा गोंधळ बंद करा आणि हा कायदा पारित करा. हा कायदा पारित केला नाही तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ करणार नाहीत”, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.