वाई: पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती सरकार व सगळे घटक पक्ष काम करत आहेत. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात जो उमेदवार असेल त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आजची सभा आयोजित करण्यात आली असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात सांगितले.
सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीची पहिली एकत्रित सभा साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या सभेला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, विक्रम पावसकर, डाॅ. दिलीप येळगावकर, सुनील काटकर, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>“मिलिंद देवरा शिंदे गटाआधी आमच्याकडे…”, ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “ते त्या दुकानात गेले कारण…”
शिवाजी महाराजांनी जो सर्वधर्म समभाव एकत्रित करून सर्वांना न्याय दिला होता, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वधर्म समभाव एकत्र करून राज्यकारभार करत आहेत. ते आज सर्वांशी समन्वय आणि संवाद साधत असल्याने देश मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींकडे भारत आणि जग मोठ्या आशेने पाहत आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आजची सभा आयोजित करण्यात आली आहे. आम्ही सर्व महायुतीचे घटक पक्ष स्वार्थासाठी एकत्र आलो नसून विकासाच्या मुद्द्यावरच एकत्र आलो आहोत. राज्यातील सर्व ४८ जागा या महायुती जिंकेल असेही हजार उदयनराजे यांनी सांगितले. राज्यात सुरू असणारे ओबीसी व मराठा वाद टाळायला हवेत. इतर राज्याने आरक्षणात जशी वाढ करून सर्वांना न्याय दिला तसेच महाराष्ट्र शासनाने आरक्षणात वाढ करून मराठा समाजालाही आरक्षण द्यावे असेही उदयनराजे म्हणाले .
हेही वाचा >>>“आम्हाला बँडवाले समजलात का?”, सदाभाऊ खोत यांचा महायुती मेळाव्यात संतप्त सवाल; म्हणाले, “आमचा अपमान…”
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत हेच उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाची चौफेर घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला विकासाच्या बाबतीत वेगळ्या उंची उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम या दोघांनी व देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले आहे. शेती औद्योगिक विकास सर्वसामान्यांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे अतिशय गांभीर्यपूर्वक नेतृत्वाने सोडवलेले असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. यावेळी आमदार मकरंद पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे अशोक गायकवाड आदींची भाषणे झाली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गांधी मैदानावर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात सहभागी मुख्य व घटक पक्ष, संघटनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने मेळाव्याची नियोजित वेळ उलटून गेली तरी राजवाड्यावरील गांधी मैदानाकडे कार्यकर्ते व सातारकर नागरिकांनी पाठ फिरवली होती.अनेक खुर्च्या मोकळ्याच असल्याचे दिसून येत होते.सभेला गर्दी करण्यासाठी महायुतीची दमछाक झाल्याचे दिसून येत होते.आरपीआय नेत्यांनी आपल्या नेत्यांचे फ्लेक्सवर फोटो नसल्याने सभेतच नेत्यांना खडेबोल सुनावले.यावेळी खा. उदयनराजे भोसले यांची जोरदार एन्ट्री केली.मेळाव्याला गर्दी नसल्याची छायाचित्रे समाज माध्यमावर येताच अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सभास्थळी धाव घेतली आणि चार ची सभा साडेसहा नंतर सुरू झाली.नंतर सभास्थळी गर्दी होऊ लागली.