राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे म्हणाले, “जसं राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख असतो, तसं राज्यपाल हे पद यावर जे कोणी विराजमान असतात ते या राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणं हे त्यांच्याकडून लोकांना अपेक्षित असतं. कारण नसताना कुठलही विधान करणं. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे कारण नसताना जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होतात, हे कशासाठी? ”

हेही वाचा – “…ते काम पूर्ण झालं असं भाजपाला वाटत असेल, म्हणून आता कोश्यारींना पदावरून हटवलं” नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

याशिवाय, “जगभरातील मोठे योद्धे आणि शिवाजी महाराजांमध्ये एकच फरक होता, तो म्हणजे ते सगळे लढले ते स्वत:चं साम्राज्य वाढवण्यसाठी परंतु शिवाजी महाराजांनी युद्ध केलं ते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आजही आपण आपल्या देवघरात शिवाजी महाराजांना बघतो. असं असताना ज्यांची ती उंची नाही आणि ते कधी उंचीही गाठू शकणार नाही, असे ते लोक विधान करत असताना, मग राजकारणातील किंवा राजकारणाच्या बाहेरील असतील ही एवढी मोठी विकृती आता आपल्याला पाहायला मिळते. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता, विचारांची व्याप्ती ही संकुचित आहे. शिवाजी महाराजांनी केवळ स्वत:च्या कुटंबाचाच विचार केला नाहीतर त्यांनी संपूर्ण देशाला आपलं कुटुंबं समजलं. परंतु अलीकडील काळातील लोकांना कारण नसताना एवढा अहंकार निर्माण झाला आहे.” असंही उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा – “महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर …” कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “एक ते भगतसिंग होते, ज्यांचं संपूर्ण देश नाव घेतो. दुर्दैवाने सांगावासं वाटतं हे भगतसिंह म्हणजे त्यांच्या आई-वडिलांनी ज्यावेळी त्यांचं नामकरण केलं, भगतसिंह त्यांचं नाव ठेवलं ठीक आहे पण तुम्ही त्या पदावर असताना जरा भान राखलं पाहिजे की नाही? खंतं एवढीच वाटते की उशीर झाला. वेळेत जर निर्णय घेतला तर बरच काही सावरता येतं, उशीरा मिळालेला न्याय हा खरंतर अन्याय असतो. ज्याप्रमाणे सरकारी नोकरीसाठी निवृत्ती वय निश्चित असतं, तसंच राजकारणातील लोकांसाठी ठरवलं पाहिजे.” असंही उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.