मुंबई: राज्यात सर्पाकार स्थिती निर्माण झाली आहे. महायुती सरकारमध्ये सत्तेसाठी साठमारी सुरू असून तेथे तीन साप एकत्र बसले आहेत. या सापांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडात आल्या आहेत. ते सगळेच एकमेकांना गिळायला बसले आहेत. हे असे प्रकार सुरू झाल्यानंतर जनतेकडे पाहणार कोण, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील कुंडलिक खांडे यांनी पुन्हा शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. खांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. यावेळी त्यांनी खांडे यांना चूक सुधारल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. चूक झाली तर समजू शकतो पण अपराध होता कामा नये. एखाद्या वेळी रागाच्या भरात किंवा अनावधानाने चुकीचे पाऊल उचलले जाऊ शकते. पण त्यानंतर लक्षात आल्यावर ती चूक सुधारली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी सरकारवर टीका करताना त्यांनी मराठवाड्या दौऱ्याचा संदर्भ दिला. सध्या महाराष्ट्र आपला कोण, याकडे पाहत आहे. कारण तिथे सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. सगळेच एकमेकांना गिळायला बसले असून जनता आणि शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे आपण त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. आम्हालाही सत्ता पाहिजे. पण ती जनतेचे भले करण्यासाठी हवी आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले हे सर्वांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांमध्ये जातो तेव्हा शेतकरी आवर्जुन सांगतो की, तुम्ही आमची कर्जमुक्ती केली तशी आजपर्यंत कुणी केली नाही. ते कर्तव्य होते, ते बजावले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जनतेच्या पाठीशी उभे रहा
आताची लढाई ही फक्त शिवसेनेपुरती नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना ही मराठी, हिंदू आणि महाराष्ट्रासाठी स्थापन केली होती. हाच हेतू आताचे गद्दार विसरले आहेत आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत, अशी टीका करतानाच गोपीनाथ मुंडे असताना आपण बीडला झुकते माप दिले होते. पण आता बीडची विल्हेवाट लागली आहे. तिथे कुणीच कुणाचे राहिलेले नाही आहे. अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
